ऐसीं अक्षरें रसिकें’ या रचनेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.
Solution
मराठी भाषेचा गौरव करताना व शब्दांची महती सांगताना संत
ज्ञानेश्वर म्हणतात.
कौतकास्पद असलेला माझा मराठीचा बोल (शब्द) अमृताशीही
पैज जिंकणारा आहे. अशी रसाळ अक्षरे मी मराठीत निर्माण करीन. ||१||
या शब्दांची कोमलता इतकी आहे की त्यांच्यापुढे संगीताचे रंगही
फिके पडतात. माझ्या शब्दांना इतका गंध आहे की त्यापुढे (फुलांच्या)
सुगंधाचेही बळ तोकडे पडते, सुगंधाचेही गर्वहरण होते. ।। २ ।।
मराठी भाषेच्या रसाळपणाचा इतका मोह होतो की, कानांना जिभा
फुटतात. श्रवणाला स्वाद येतो. शरीराचे सर्व अवयव (इंद्रिये)
एकमेकांशी भांडू लागतात. प्रत्येक इंद्रियाला मराठी भाषा केवळ
आपलीच आहे, असे वाटू लागते. ।। ३ ।।
खरे म्हणजे, शब्द हा श्रवणाचा (ऐकण्याचा) विषय आहे. परंतु
जीभ म्हणते की, तो रस (शब्द) माझा आहे. मला आस्वादायचा
आहे. नाकाला तर शब्दांचा सुगंध येऊ लागतो. त्यामुळे नाक म्हणते
शब्द हा माझा विषय आहे.।४ ।
या रेखेच्या वाहणीचे (शब्दांचे) नवल असे की हे शब्दचित्र पाहून
डोळ्यांची तृप्ती होते. डोळ्यांचे पारणे फिटते. डोळे म्हणतात की
आमच्यासाठीच हे सौंदर्याचे भांडार खुले केले आहे.।। ५ ।।
जेव्हा संपूर्ण सार्थ शब्द उभा ठाकतो, तेव्हा मन त्याला
आस्वादण्यासाठी शरीराबाहेर झेप घेते आणि हात त्याला मिठीत
घ्यायला पुढे सरसावतात. हातांना आलिंगन दयावेसे वाटते. ।। ६ ।।
अशा प्रकारे सर्व इंद्रिये आपापल्या परीने शब्दाला बिलगतात आणि
'शब्दही उत्तम प्रकारे सर्व इंद्रियांचे समाधान करतो. ज्याप्रमाणे एकटा
सूर्य चराचराला उजळतो.।।७।।
त्याप्रमाणे माझ्या मराठी शब्दाचे असामान्य, अलौकिक असे
व्यापकपण, विस्तार, अफाटपणा आहे. जाणकार रसिक लोकांना तर
मराठी भाषा ही हरएक इच्छा पूर्ण करणाऱ्या चिंतामणी सारखी भावते,
पसंतीस येते. ।। ८ ।।
हे असो. तर मी या मराठी शब्दांची शिगोशीग ताटे भरली आहेत.
त्यावर कैवल्यरस वाढला आहे. अशी निष्काम कर्मयोगाची मेजवानी
मी तयार केली आहे.।।९।।
आता या नित्य नूतन आत्मप्रकाशाची समई (दीपज्योती) मी तेवत
'ठेवली आहे. मराठी भाषेची ही अक्षय संपदा जो इंद्रियातीत, इंद्रियांच्या
पलीकडे जाऊन नि:संगपणे आस्वादेल, त्यालाच ती प्राप्त
होईल.।।१०।।
आता श्रोतेहो एक गोष्ट करा, मी निरूपण करीत असलेली मराठी
भाषेची थोरवी ऐकण्याच्याही पलीकडे जाऊन मनाने आत्मरत होऊन
आस्वादा. (हा कैवलरस मोदक तुम्ही मनाने अनुभव.)।। ११ ।।