अभिव्यक्ती.
तुमच्या परिसरातील कष्टकरी स्त्रियांचे कुटुंबाच्या उदरनिर्वाहातील योगदान स्पष्ट करा.
Solution
आमच्या इमारतीच्या समोर रस्त्याच्या पलीकडे कामगारांची वस्ती आहे. या वस्तीतील काही स्त्रिया सकाळी इमारतीच्या बांधकामात मजुरीसाठी जातात. पहाटे पहाटे आपापल्या खोपटात चुलीवर जेवण करतात. जाळाचा धूर घरभर पसरलेला असतो. त्यातही त्या आपल्या लहानग्या मुलांना जोजवत भाजी-भाकरी करीत असतात. लगबगीने सर्व आवरून पटकुरात भाकरी गुंडाळून नि छोट्यांना कमरेवर घेऊन झपाझपा मजुरीसाठी निघतात.
कष्टकरी स्त्रिया घाईघाईने कामावर मजुरीच्या ठिकाणी पोहोचतात. ठेकेदाराचा आरडाओरडा सहन करीत लहानग्याला झोळीत ठेवतात अन् मग रेतीची घमेली डोईवर घेऊन त्यांची मजुरी सुरू होते. न थकता ओझे उचलून नि शारीरिक दुखण्याकडे दुर्लक्ष करून इमानेइतबारे दिवसभर उन्हातान्हात पायऱ्यांवरून चढ-उतार करून आपले काम नेटाने करतात. दुपारी थोडा वेळ एकत्र जमून मीठ-भाकर खाऊन तिथल्याच एखादया नळाचे पाणी पितात आणि पुन्हा झटझटून त्यांचे ओझी उचलणे सुरू होते. दिवस सरून गेल्यावर जड पावलांनी घरी परततात. मिळालेल्या रोजगारातून रात्रीच्या जेवणाचे सामान खरेदी करून घरी येतात. पुन्हा त्यांच्या वाट्याला पेटलेली चूल, रडणारे मूल व 'आ'वासलेली भुकेली तोंडे हेच येते. काहीही तक्रार न करता निमूटपणे ही कामगार स्त्री आपल्या संसारासाठी हाडाची काडे करून जगत असते.