अभिव्यक्ती.
‘समुद्र तुमच्याशी संवाद साधत आहे’, अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा.
Solution
मी समुद्र बोलतोय. आज न राहवून मी माझ्या मनातील वेदना व्यक्त करतोय. पूर्वी 'समुद्र अथांग आहे, असीम आहे.' अशी वाक्ये माझ्या कानावर पडायची, तेव्हा मला अफाट आनंद होत असे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 'सागरा प्राण तळमळला' अशी जेव्हा मला साद घातली, तेव्हा माझा ऊर भरून आला; कारण भारतीय स्वातंत्र्याची आस मलाही होती. कुसुमाग्रज यांनी तर 'कोलंबसाचे गर्वगीत' या कवितेत "हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे डळमळू दे तारे, कथा या खुळ्या सागराला/ अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला" असे आव्हान दिले, तेव्हा माणसाच्या ध्येयासक्तीला किनारा नाही, याचा मलाही अभिमान वाटला. पण आजचे निराशाजनक चित्र पाहून मात्र जीव खचतो माझा! पूर्वी माझ्या किनाऱ्यावरून मी अफाट, मैलोनमैल पसरलेली धरती न्याहाळायचो. त्या धरणीमायची साथ मला असायची. तिच्या कुशीत जाण्यासाठी मी लाटा उसळून आतुरतेने तळमळायचो.
पण याच माझ्या किनाऱ्यावर आज मानवाने उत्तुंग, टोलेजंग, उंचच उंच इमारती उभारून धरणीमाय अदृश्य केली आहे. आजचा मानव आकाशाला गवसणी घालायला निघाला; पण जमिनीवरचे पाय विसरला. प्रचंड वेगाने भौतिक सुखे पदरात पाडून घेताना मायेचा पदर त्याला पारखा झाला. लौकिक सुखाच्या हव्यासापोटी त्याने चंगळवादी संस्कृतीला जन्म दिला. प्रगती व यश यांच्या चुकीच्या संकल्पना मनात घोळवू लागला व निसर्गाला पारखा झाला.
पंचमहाभूतांपैकी मी एक 'भूत' तुम्हांला सांगत आहे. तुम्ही वेळीच सावध झाला नाहीत, तर तुमच्या भविष्यातील भूत तुमच्याच मानगुटीवर बसेल नि मग प्राण दयायला माझ्याकडे याल, तेव्हा माझी माया आटलेली असेल!