अभिव्यक्ती.
कारगिलमधील पुलावर पहारा करणाऱ्या सैनिकाच्या, ‘सिर्फ दिमाग में डाल देना है ।’ या उद्गारातील आशय तुमच्या जीवनात तुम्ही कसा अंमलात आणाल ते लिहा.
Solution
सिर्फ दिमाग में डालना है!' हा मंत्र मला खूप मोलाचा वाटतो. हा मंत्र मला खूप आवडला आहे. तो मी प्रत्यक्षात अमलात आणणारच आहे. मी काही वेळा असे केलेलेच आहे. फरक एवढाच की, त्या वेळी हा मंत्र मला ठाऊक नव्हता. मी धडाक्यात काही गोष्टी पार पाडल्या आहेत. मी दोन उदाहरणे सांगतो. त्यावरून मी काय करणार आहे, हे लक्षात येईलच.
गेल्या वर्षीचीच गोष्ट आहे ही, मला निबंध लिहिणे अजिबात जमत नसे. लिहायला बसलो की सुरुवात कशी करू?, या प्रश्नावरच गाडी अडायची. एकदा मी झटक्यात ठरवले.. निबंध लिहायचाच. आता वाट बघत बसायचे नाही. मी लिहायला सुरुवात केली. पहिली दोन तीन वाक्ये लिहिल्यावर पुढे लिहिता येईना. विचार केला. तेव्हा लक्षात आले... माझा मुद्द्यांबाबत गोंधळ उडतोय. मग मुद्दे लिहायला घेतले. सुचतील ते मुद्दे लिहून काढले. मग त्यांचा क्रम लावला. दोनतीन वेळा ते मुद्दे नवीन क्रमाने वाचले. प्रत्येक मुद्द्याबाबत मी काय विवेचन करीन, याचा मागोवा घेतला. ... आणि सरळ लिहायला सुरुवात केली. न थांबता लिहितच गेलो. निबंध पूर्ण झाला. तो मी सरांना दाखवला. सरांनी 'उत्तम' असा शेरा देऊन शाबासकी दिली. मी खूश!
दुसरा प्रसंग. मी सकाळी सकाळी टीव्हीवर मॅच बघत होतो. सहज माझे लक्ष गेले. आईने बादलीत गरम पाणी काढले होते. त्यात साबणपूड मिसळली आणि बरेच कपडे जमा करून त्या पाण्यात तिने ते कपडे भिजवले. बादली उचलून बाजूला ठेवतानाही तिला खूप कष्ट पडलेले मी पाहिले. मला कसेसेच वाटले. मी इथे आरामात टीव्ही पाहणार आणि जेवढे तिला उचलायलाही झेपत नाहीत, तेवढे कपडे ती धुणार! मनात आले... आपणच का धुवू नयेत? पण शंका आली... आपल्याला झेपेल? किती वेळ लागेल? हात दुखतील? पण तत्क्षणी विचार आला... आईला हे प्रश्न पडतात? ती कशी धुणार? ते काही नाही. मी ठरवून टाकले... आपणच धुवायचे. मी न्हाणीघरात गेलो. एकेक कपडा नीट पाहून, मळलेला भाग लक्षात घेऊन कपडे ब्रशने व्यवस्थित घासले. एकेक कपडा घेऊन हासळून घुसळून सर्व कपडे धुवून टाकले. माझे मलाच आश्चर्य वाटले.
हे मला कसे जमले? आता माझ्या लक्षात आले. हाच तो मंत्र 'सिर्फ दिमाग में डालना है!' आता मी ठरवून टाकले आहे... मी माझ्या कामांचे नियोजन करणार आणि हे असेच नियोजनानुसार पार पाडणार... असे... दिमाग में डाल दे दूँगा! मला खात्री आहे मी यशस्वी होणारच.