आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत सांगा.
Solution
'अंकिला मी दास तुझा' या अभंगात संत नामदेवांनी आई-बाळ, पक्षीण-तिची पिल्ले, गाय-वासरू, हरिणी-तिचे पाडस अशा विविध उदाहरणांतून मातृप्रेमाचे वर्णन केले आहे.
आई आणि मुलाचे नाते अत्यंत जवळचे, जिव्हाळ्याचे असते, म्हणून आपल्या मुलाला संकटात पाहून कोणतीही आई कशाचीही पर्वा न करता आपल्या बाळाकडे धाव घेते, त्याला त्या संकटातून बाहेर काढते. आगीच्या जवळ जाणाऱ्या किंवा आगीच्या तडाख्यात सापडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी त्याची माऊली धाव घेते. पक्षीण जरी आकाशात विहार करत असली तरी आपली पिल्ले जमिनीवर कोसळताच त्यांच्या चिंतेने ती लगेच खाली झेप घेते.
भुकेले वासरू जेव्हा गायीच्या दुधासाठी हंबरू लागते, तेव्हा ती गायही सारे काही सोडून आपल्या पिल्लाकडे हंबरत धाव घेते. वनात फिरणाऱ्या हरिणीला वणवा लागल्याचे कळताच ती पाडसाच्या चिंतेने व्याकुळ, कावरीबावरी होते, आपल्या पिल्लाजवळ धाव घेते. अशाप्रकारे, संतकवी नामदेवांनी या अभंगातून आई, पक्षीण, गाय, हरिणी या मातांच्या ममतेचे, कनवाळू वृत्तीचे समर्पक वर्णन केले आहे.