खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.
आदिवासी समाजात असणाऱ्या राजू नावाच्या मुलाला शिक्षणाची आवड असल्याने तो रानावनात झाडांच्या खोडांवर जमिनीवर अक्षरे गिरवायला शिकला. त्याची ती शिक्षणाची ओढ पाहून आई-वडिलांना आश्चर्य वाटत असे. असेच एकदा क्षेत्रभेटीसाठी सुहास नावाचे गुरुजी विद्यार्थ्यांना घेऊन त्या भागात आले. त्यांनी राजूची अभिलाषा ओळखली आणि त्याच्या आई-वडिलांची परवानगी घेऊन राजूला आपल्या शाळेत दाखल केले आणि...
Solution
हिऱ्याची पारख |
आदिवासी समाजात असणाऱ्या राजू नावाच्या मुलाला शिक्षणाची आवड असल्याने तो रानावनात झाडांच्या खोडांवर जमिनीवर अक्षरे गिरवायला शिकला. त्याची ती शिक्षणाची ओढ पाहून आई-वडिलांना आश्चर्य वाटत असे. असेच एकदा क्षेत्रभेटीसाठी सुहास नावाचे गुरुजी विद्यार्थ्यांना घेऊन त्या भागात आले. त्यांनी राजूची अभिलाषा ओळखली आणि त्याच्या आई-वडिलांची परवानगी घेऊन राजूला आपल्या शाळेत दाखल केले आणि त्याचे जग बदलले. सुरुवातीला काही दिवस त्याच्यासाठी कठीण होते. इतर विद्यार्थी त्याची टिंगल करत. त्याची भाषा आदिवासी असल्याने तो बोलायला लागला, की इतर विद्यार्थी त्याला हसत. सुरुवातीला राजू या साऱ्यापासून दूर पळत असे. बोलायला घाबरत असे; पण गुरुजींनी दाखवलेला विश्वास आठवत राजूने या साऱ्याकडे दुर्लक्ष केले. त्याने गुरुजी काय सांगतात याकडे आपले लक्ष क्रेंद्रित केले. रानावनात राहणाऱ्या राजूने अल्पावधीतच आपल्या हुशारीच्या आणि मेहनतीच्या जोरावर सुहास गुरुजींच्या मनात आपली जागा निर्माण केली. गुरुजी त्याला मार्गदर्शन करत. राजूदेखील गुरुजींनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट कान देऊन ऐकत असे. गुरुजींचा प्रत्येक शब्द त्याच्यासाठी महत्त्वाचा होता. राजूने आपल्या मेहनतीमुळे दहावीच्या परीक्षेत ९५% गुण मिळवले आणि तो संपूर्ण तालुक्यात पहिला आला. गुरुजींनी त्याला प्रेमभराने मिठी मारली आणि राजूच्या डोळयांत आनंदाश्रू तरळले. सुहास गुरुजींसारख्या शिक्षकाने जातिवंत हिऱ्याची पारख केली आणि त्याला आकार दिला आणि राजूने त्यांची निवड सार्थ ठरवली. तात्पर्य: एखाद्या व्यक्तीने आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी केलेली मेहनत कधीही वाया जात नाही. |